रायगड जिल्ह्यात पाणीच पाणी 

रायगड जिल्ह्यात पाणीच पाणी 

रायगड जिल्ह्यात पाणीच पाणी

कुंडलिका नदी इशारा पातळीच्यावरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने रोहा शहर आणि नदी किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कालच्या तुलनेत आंबा नदीची पातळी मात्र घटली आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४३ मिमी पावसाची नोंद झाली. अलिबाग ५८ मिमी, पेण ५५ मिमी, मुरुड ९३ मिमी, पनवेल ५६ मिमी, उरण ५७ मिमी, कर्जत ८१ मिमी, खालापूर ६७ मिमी, माणगाव ३२६ मिमी रोहा २१० मिमी, सुधागड २०३ मिमी, तळा २६५ मिमी, महाड १४७ मिमी, पोलादपूर २०८ मिमी, म्हसळा १७६ मिमी, श्रीवर्धन १५८ मिमी, माथेरान १४० मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

आजही सकाळपासून पावसाचा जोरदार सरी बहुतांश भागात कोसळत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदी किनाऱ्यांवरील तसेच डोंगर उतारावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्कालीन परिस्थितीत ०२१४१-२२२११८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे नद्या-नाले ओसंडून वाहत असून महाड शहरात पूरस्थिती कायम आहे. तर अतिवृष्टीमुळे घोणसे घाटात दरड कोसळली आहे. जिल्ह्यात २४ तासात १४३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. माणगाव येथे सर्वाधिक ३२६ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला आहे. महाडमधून १०० जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले असून चार रेस्क्यू बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. नदीची धोका पातळी ६,७० मीटर असून ती सध्या ७.९० मीटरवरुन वाहते आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वृक्ष उन्मळून पडणे, सखल भागात पाणी साचणे, विद्युत पुरवठा खंडीत होणे यासारख्या घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. सावित्री नदी अजूनही धोका पातळीच्यावर आहे. त्यामुळे महाड शहरात पूरस्थिती कायम आहे. शहरातील दस्तुरी नाका, बाजारपेठ, गांधारी पूल, सुकट गल्ली परिसरात दोन ते अडीच फूट पाणी आहे. नगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. घोणसे घाटात दरड कोसळल्याने माणगावकडून श्रीवर्धनला जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरड हटविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.